________________
चमत्कार
33
श्रद्धा बसते! पण यात आपल्याला काय फायदा ? ह्या संपूर्ण जगाला जरी हलवले, तरीही मी म्हणेन की तू कशासाठी डोकेफोड करतोस ? उगाचच विना कारण ! गप्प बस ना, झोपून जा गपचूप ! यात आम्हाला काय फायदा ? अज्ञान दूर झाले तर समजावे की फायदा झाला. बाकी, हे कपाट इथून तिथे सरकले त्यात आपला काय फायदा ? म्हणून आपण एवढे म्हणावे की मला त्याचा काय फायदा ?
प्रश्नकर्ता : मला असे वाटले होते की ती जागा पवित्र झाली!
दादाश्री : सर्व जग पवित्रच आहे ना ! हे तर सारे विकल्प आहेत. आपल्याला तर आपले काम झाले तरच खरे. बाकी हे सर्व पोल (दिखावे) आहेत. अनंत जन्मांपासून सारखे हेच करत आलो आहोत ना ! अमक्या ठिकाणी देव हालले, मूर्ति हालली. अरे, पण त्यात तुझा काय फायदा झाला ? लोक तर म्हणतील, असे झाले आणि तसे झाले. पण आपण आपला फायदा पाहावा.
लोक मला सांगतात की, हा टीपॉय उड्या मारेल असे करा ! तर ते शक्य आहे. त्यासाठी प्रयोग असतो. पण तसे केल्याने काय होणार ? टीपॉय उड्या मारु लागला त्यामुळे काय होईल? मग तर इथे माणसे मावणार नाहीत, हा जिना तुटून जाईल आणि तुम्ही जे खरे ग्राहक आहात, तुम्हाला धक्का मारुन हाकलून देतील आणि दुसरे सगळे घुसतील. चमत्कार पाहण्यासाठी घुसतील. आपल्याला असे करण्याची काय गरज आहे ? ही तर खऱ्या ग्राहकांची जागा आहे. खरा ग्राहक तोच की ज्याला मोक्षाला जायचे आहे, ज्याला भगवंताची ओळख करून घ्यायची आहे, साक्षात्कार करायचा आहे, त्यांच्यासाठी ही जागा आहे. हे अंतिम स्टेशन आहे ! इथे असे-तसे सर्व नसते. इतर जागी लोकांना श्रद्धा बसावी याकरीता चमत्कार करतात. बाकी, ते तुमच्या सारख्यांसाठी नाही !
अरे, पुष्कळ माणसं तर एखाद्या झोपलेल्या माणसाचा हात वर करून देतात! तो तर झोपलेला आहे मग हात कसा वर झाला ? हात वर झाला म्हणून काय तो जागा झाला ? तो तर झोपलेला आहे. ही सर्व मशीनरी आहे! यात आपले काही काम होत नाही.