________________ वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना प्रार्थना (दररोज एकवेळा म्हणायची) हे निरागी, निर्विकारी, सच्चिदानंद स्वरूप, सहजानंदी, अनंतज्ञानी, अनंतदर्शी, त्रैलोक्य प्रकाशक, प्रत्यक्ष-प्रकट ज्ञानीपुरूष श्री दादा भगवानांच्या साक्षीने आपणास अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करून, आपले अनन्य शरण स्विकारीत आहे. हे प्रभू ! मला आपल्या चरणकमलात स्थान देऊन अनंतकाळाच्या भयंकर भटकंतीचा अंत आणण्याची कृपा करा, कृपा करा, कृपा करा. हे विश्ववंद्य असे प्रकट परमात्म स्वरूप प्रभू! आपले स्वरूप तेच माझे स्वरूप आहे. परंतु अज्ञानतेमुळे मला माझे परमात्म स्वरूप समजत नाही. म्हणून आपल्या स्वरूपातच मी माझ्या स्वरूपाचे निरंतर दर्शन करू अशी मला परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. हे परमतारक देवाधिदेव, संसाररूपी नाटकाच्या आरंभ काळापासून आजच्या दिवसाच्या अद्यक्षणापर्यंत कोणत्याही देहधारी जीवात्म्याच्या मन-वचनकायेच्या प्रति जे अनंत दोष केले आहेत, त्या प्रत्येक दोषाला पाहून, त्याचे प्रतिक्रमण करण्याची मला शक्ति द्या. त्या सर्व दोषांची मी आपल्यापाशी क्षमायाचना करीत आहे. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करीत आहे. हे प्रभू ! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि माझ्याकडून पुन्हा असे दोष कधीही होऊ नयेत यासाठी दृढ निर्धार करीत आहे. त्यासाठी मला जागृति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या. आपल्या प्रत्येक पावन पदचिन्हांवर तीर्थाची स्थापना करणारे हे तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी प्रभू ! संसारातील सर्व जीवांप्रति संपूर्ण अविराधक भाव आणि सर्व समकिती जीवांप्रति संपूर्ण आराधक भाव माझ्या हृदयात सदा संस्थापित राहो, संस्थापित राहो, संस्थापित राहो ! भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील सर्व क्षेत्रांतील सर्व ज्ञानी भगवंतांना माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो ! हे प्रभू ! आपण माझ्यावर अशा कृपेचा वर्षाव करा की ज्यामुळे मला ह्या भरतक्षेत्रातील आपल्या प्रतिनिधी समान कोणी ज्ञानी पुरूषाचा, सत् पुरूषाचा सत् समागम होवो आणि त्यांचा कृपाधिकारी बनून आपल्या चरणकमलापर्यंत पोहोचण्याची पात्रता प्राप्त करू. हे शासन देवी-देवता ! हे पांचागुलि यक्षिणीदेवी तसेच हे चांद्रायण यक्षदेव ! हे श्री पद्मावती देवी ! मला श्री सीमंधर स्वामींच्या चरणकमलात स्थान मिळविण्याच्या मार्गात कोणतेही विघ्न न येवो, असे अभूतपूर्व रक्षण प्रदान करण्याची कृपा करा आणि केवळज्ञान स्वरूपातच राहण्याची परम शक्ति द्या, परम शक्ति द्या, परम शक्ति द्या !