________________
चमत्कार
करू शकत नाही मग जगात रक्षण कोण करणार?' तेव्हा काय भगवान महावीर रक्षण करू शकतील असे नव्हते? या सर्व सिद्धीवाल्यांपेक्षा ते काय कमी होते? कसे भगवंत, तीर्थंकर भगवंत! त्यांनी काय उत्तर दिले माहित आहे का तुम्हाला? भगवंत म्हणाले, 'मी जीवनदाता नाही, मी तर मोक्षदाता आहे !' 'कोणी मरेल, त्यास जीवनदान देणारा नाही, मी तर मोक्षाचे दान देण्यास आलो आहे!' आता त्या लोकांना तर असेच वाटेल ना की, या गुरुंपेक्षा तर कोणी दुसरे गुरु केले असते तर चांगले झाले असते. पण माझ्या सारख्याला तर किती आनंद होणार! धन्यभाग्य गुरु हे! म्हणावे लागेल! यांचाच शिष्य होण्याची गरज आहे. तर यांचाच मी शिष्य झालो होतो. त्याच महावीरांचा शिष्य झालो होतो. कसे भगवान महावीर! गोशालाने त्यांची फसवणूक केली, खूप लोकांनी फसवले, त्रास दिला पण भगवंतांची स्थिरता ढळली नाही, ते कधी विचलीत झाले नाहीत. त्यांनी कधी सिद्धी वापरली नाही!
नंतर गोशालाने भगवंतांवर काय केले होते हे माहित आहे का तुम्हाला? तेजोलेश्या सोडली होती. त्या दोन शिष्यांवर सुद्धा त्याने तेजोलेश्याच सोडली होती, ते दोघे खलास झाले, तसेच भगवंत सुद्धा खलास झाले असते. पण भगवंत तर चरम शरीरी असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा घात होऊ शकत नाही. चरम शरीर तर कापल्यानेही कापले जात नाही, म्हणजे पुद्गल सुद्धा असे सुंदर! पण मग सहा महिन्यांपर्यंत संडासातून खूप रक्त गेले. तरी सुद्धा त्या पुरुषाने (भगवंताने) थोडी सुद्धा सिद्धी वापरली नाही!
सिद्धी वापरत नाहीत, ते ज्ञानी आणि ज्ञानीपुरुष सुद्धा सिद्धी वापरत नाहीत. आमच्या हाताने सहज जरी स्पर्श झाला तरी समोरच्याचे कल्याण होऊन जाते. बाकी, 'ज्ञानीपुरुष' त्यांच्या घरीही सिद्धी वापरत नाहीत आणि बाहेरही वापरत नाहीत, स्वत:च्या शरीरासाठी सुद्धा वापरत नाहीत! कशासाठी डॉक्टरकडे जातात? हे डॉक्टर तर विचारतात की, 'तुम्हा ज्ञानीपुरुषांना कशासाठी यावे लागते?' तेव्हा मी सांगितले, 'मी पेशन्ट आहे, म्हणून यावे लागते.' म्हणजे देहासाठी सुद्धा कोणत्याही सिद्धीचा उपयोग करायचा नाही.